शारदीय नवरात्रोत्सव कोल्हापूर 2020
घटस्थापनेने उद्या (ता. १७) पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर उत्सवकाळात भाविकांसाठी बंदच असले, तरी सर्व धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. नऊ दिवस नऊ रूपांतील विविध सालंकृत पूजा बांधल्या जाणार असून, त्याची माहिती आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर यांनी दिली.
दरम्यान, मंदिरातील तयारी पूर्ण झाली असून, रोषणाईने मंदिर परिसर उजळला आहे. सकाळी नऊच्या सुमारास तोफेची सलामी दिल्यावर घटस्थापना होईल. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी दहाला परंपरेप्रमाणे घटस्थापना होईल. उत्सवकाळात देवीच्या रोज विविध रूपांत सालंकृत पूजा बांधल्या जातील.
दहा ठिकाणी लाईव्ह दर्शन
श्री अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी शहरात दहा ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारले आहेत. या स्क्रीनवरून श्री अंबाबाईच्या लाईव्ह दर्शनासह विविध धार्मिक विधी भाविकांना पाहता येणार आहेत. येथे असतील स्क्रीन: बिनखांबी गणेश मंदिर चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, उभा मारुती चौक, मिरजकर तिकटी, राजारामपुरी जनता बझार चौक, क्रशर चौक, व्हीनस कॉर्नर चौक, भगवा चौक (कसबा बावडा), ताराराणी चौक.