Project Description

अंबायन

सकाळी प्रसन्न वातावरणात हा प्रवास करताना शिवाजी पुलापुढे गेल्यावर उसाची हिरवीगार शेती.अधेमधे भेटणारी पंचगंगा नदी व नजरेला खुणावणारे जोतिबा डोंगर व पन्हाळा पावनगडच्या रांगा.

वाघबीळचा घाट चढून पुढे बोरपाडळयाचा घाट उतरेपर्यंत पुर्वेला वारणेचे खोरे व पश्चिमेला पन्हाळा गड पाहत आपला प्रवास पुढे येणाऱ्या आंबा- पावनखिंड भेटीची उत्सुकता वाढवत असतो.पण त्याच्या जोडीला वाटेत भेटणारी पैजारवाडी ते शाहूवाडी पर्यंतचे गोलमटोल डोंगर जणू एखाद्या परिकथेतल्या देखण्या हत्तींची आठवण करून देतात.विशेषत पावसाळ्याचे ४-५ महीने हे डोंगर हिरवाईने नटलेले असतात आणि आपले देखणेपण आणखी उठवून दाखवत असतात.आपल्याच रुबाबात हे डोंगर जणू डोलत असल्याचा भास होतो.

शाहूवाडी-मलकापूर कधी येते कळतच नाही.मलकापुरातून डावीकडे वळणाऱ्या अणूस्कुरा -येववणच्या मार्गावर पावनखिंड संग्रामच्या अजरामर पाऊल खुणा आपणास खुणवायला लागतात.महाराजांची दगडी वाट (पाखाडी)पांढरपावणीची विहीर.घोडमाळ आणि दस्तरखुद्द पावनखिंड.

येथे आपणास भेटीतील
( पूर्वसूचनेनुसारच) प्रमोद माळी किंवा अजिंक्य बेर्डे.

शिक्षण पूर्ण झाले कि शहराकडे लोंढ्याने येणाऱ्या तरुणाईला१८० अंशातील अपवाद म्हणजे आंब्यातील ही “व्दयी”.आंबा परिसराचा निसर्ग व इतिहास कोळून प्यायलेले हे दोघे सामान्य कुटूंबातील असामान्य अभ्यासक मार्गदर्शक आहेत….सगळा मिळुन दीड तासाचा हा प्रवास पावनखिंड आल्यावर थेट ३५० वर्षे आपल्याला मागे नेतो आणि आपल्यासमोर उभा राहतो पन्हाळ्याचा वेढा- त्यातून शिवाजी महाराजांची सुटका- नरवीर शिवा काशीदांची प्रणाहूती- सिद्दी जोहरची पराभुताची तडफड-सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात ऐन जुलैमध्ये कोसळणारा पर्जन्य प्रपात -घनगच्च अरण्य व काटेरी मार्ग-छत्रपतींच्या सुखरूप सुटकेसाठी जीवाची आहुती देण्यास सज्ज ६०० मावळे- आणि त्यांचे नेतृत्व करणारे, स्वराज्य हेच सर्वस्व मानणारे, बांदल सेनानी नरवीर बाजीप्रभू व फुलाजीप्रभू देशपांडे.६००मावळे विरुद्ध ६००० गनीम असा असमतोल संग्राम ऐकायचा आणि धन्य त्या हौतात्म्य पत्करलेल्या मावळ्यांना साश्रु नयनांनी अभिवादन करायचे.

आपली माती त्यांच्या रक्ताने पुनीत झाली याचा अभिमान मानायचा.पावनखिंड- भाततळी घाट- गेळवडे धरणाचा पाणलोट नजारा-वाघझरा-कोकण दर्शन- मनोली धरण पाहत पाहत दुपारच्या भोजनाला आंब्यात यावे. येथे राजेंद्र व सायली लाड यांच्या घरी उत्कृष्ठ नाष्टा-भोजन व छोटेखानी निवासाची सोय आहे.त्यांच्याकडील दुपारच्या भोजना नंतर सुस्ती सांभाळत पुढे निघावे .

“आंबा”नाव धारण केलेली ही छोटेखानी वाडी समजून घ्यायची झाली तर आंबेश्वर देवराईला भेट देण्यावचून ते उमगणे नाही.आंबा प्रदेशारिष्ट विविध झाड-वृक्षानी भरगच्च या देवराईत आंबेश्वराचे देवस्थान आहे.सभोवार उन्हाने तापलेल्या प्रांगणातुन आपण देवराई प्रवेशलो की जाणवतो निसर्गाने निर्माण केलेला प्रेमळ -विनाअट- विनाशुल्क वातानुकूलित थंडावा येथील जैव विविधता समजून तास-दीड तासात आपण १०० मीटरवर असणाऱ्या मंदिरात पोहचावे व शांतपणे ध्यान करावे.

सांयकाळ होण्यापूर्वी वनविभागाने उभारलेले निसर्ग माहिती केंद्र आवश्य पाहावे. आंबा परिसरातील प्राणी-पक्षी-किटक-कृमींचे उत्तम माहिती सादरीकरण येथे आपण पाहतो.सूर्यास्त दर्शनास आंबा घाटात जाऊन यावे.परत लाड कुटूंबियाकडे निरोपाचा चहा घेतल्यावर परतीचा प्रवास सुरु करावा.दिवसभर कथा-माहितीमध्ये भारावलेले मन शहराकडे येताना विचारांत परत हरविले नाही तर नवल.

आपले शहर अधुनिकतेने सज्ज आहे खरे.पण रोज रोज उद्भवणाऱ्या नव्या समस्या यांच्याशी दोन हात करणाऱ्यातच आपला दिवस-आठवडा-महीना-आणि आयुष्य खर्ची पडून जाते.ध्येय-प्रेरणा-स्वकर्तुत्व यांचा मागमूसही या शहरी जीवनाला नाही. स्पर्धा-ताणतणाव-असंतुष्ट-असमाधानी मन यातच आपण गुरफटून गेलोय.

आंबा-पावनखिंडीचा हा अनुभव घेण्यासाठी, इतिहास व निसर्ग समजून घेण्यासाठी, मोकळ्या हवेत – डोंगर पहाडीत विहार करण्यासाठी आणि स्वतःमध्ये तसेच मित्र मंडळ – आप्तेष्ट- कुटुंबीयांमध्ये नवचेतना फुलविण्यासाठी, आपण आवश्य आमच्या ग्रामवारीला – अंबायनाला यावे.

आपले भरभरून स्वागत आहे.

ट्रॅव्हेला
९८२२०६३३७०

Enquire Us