Project Description
कोयनामाई – उर्जा महाराष्ट्राची
कोल्हापुरहुन कराड पाटण मार्गे किंवा सातार्याहुन उंब्रज पाटण मार्गे कोयनामाईच्या भेटीला यावे अन् तिचेच होउन जावे .
सह्याद्री डोंगर रांगातुन आपलेच राग मनसोक्त आळवत पसरलेले कोयना नदीवरील धरण – सुटसुटीत बगीचा – ओझर्डे धबधबा – रामबाण वनभ्रमण – कोकण दर्शन- येथिल छोटीशी गावं पहात पहात घरगुती जेवण मिळाले की ही भेट परमानंद साजरा करते .
आेझर्डेचा धबधबा पावसाळ्यात याची विविध रुप दाखवत कोसळत असतो. दुरुन तो धिप्पाड हत्ती व जवळुन अजस्त्र अजगर भासतो. याच्या प्रपाताकडे चढतीला गर्द झाडीतुन चालत जाताना काहीसा राेमांच व काहीशी दमछाक जणवते.पावसाळ्यानंतर धबधबा आटल्यवरही येथे पदभ्रमण करायला आवश्य यावे .
रामबाण आणि कोकण दर्शन हेसुद्धा येथिल पायपीटीचे हक्काचे ठिकाण. गच्च सावलीतुन पसरलेली पायवाट मागे टाकत काहीशी दम भरणारी चढण सर करत कोकणाचा देखावा पहायचा , नजरेत साठवायचा व परत येताना रामबाणचे मधुर पाणी चाखुन तृप्त व्हयचे.वाटेतील गावात गावफेरी करुन , तेथिल घरांची ठेवण न्याहाळुन सायंकाळचा चहा घ्यायला कुंभार्ली घाटात जाउन दुरवर पसरलेल्या डोंगररांगा नजरेत साठवुन मुक्कामाच्या ठिकाणी पोहचावे .
येथे मुक्कामासाठी मध्यम ते उच्च दर्जाच्या निवास व्यवस्था मिळु शकतात.रात्रीची नीरव शांती – आकाशात चमकणारे तारे पहात झोप कधी लागली हे कळणार नाही .आणि भल्या सकाळी गिरीभ्रमणासाठी रामघळची वाट पकडणे चुकवु नये.
रामघळला जाउन यायला दोन ते तीन तास पुरेसे होतात. हे ठिकाण डोंगराची भली मोठी कपार असुन पावसाळ्यात त्याच्या वरुन पाण्याचा मोठा प्रपात कोसळतो. आपण या कपारीत बसुन समोर पडणारे पाणी पहाताना हलकेच मनात आदी मानवाची गोष्ट डोकावुन जाते.
दुपारी धरणावरील उद्यानात यायचे व निवांतपणे धरणाची गोष्ट पाहायची , उद्यानात मनसोक्त बागडायचे.या रम्य ठीकाणी परत यायची खुणगाठ बांधायची व कोयनामाईच्या काठाकाठाने परतीची वाट पकडायची .