Project Description
राधानगरी – दाजीपुर
कोल्हापुरला मिळालेल्या अनेक वरदानापैकी हि दोन देखणी ठिकाणं.
राधानगरी भेटीची सुरुवात शाहु महाराजांनी हत्तींसाठी बांधलेल्या महालापासुन करावी . आता याचेे रुप उतरतीला असले तरी एक भारदस्त ऐतिहासीक वास्तु पाहण्यासाठी येथिल भेट आवश्यक ठरते. मोठाल्या भिंती आणि बारा हत्तींसाठी बारा खोल्या पाहील्यावर या महालाच्या भव्यत्वाची प्रचिती येते.
आता वळावे धरणाकडे.
भोगावती नदीवरील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण. छत्रपति शाहु महाराजांतील द्रष्ट्या राजाने रयतेला दिलेले आंदण. या जलाशयाचे सौंदर्य पाहायला राउतवाडी कारीवडे वळवन मार्गे दाजीपुरला पोहोचताना डोंगरउतारावरील भात – नाचण्याची खाचर , वळणदार रस्ते, वाटेवरील गावातील ग्रामजीवन पहायला मिळते.
दाजीपुर अभयारण्याच्या बाहेर वसलेल्या माळेवाडीतुन पायी चालत तेथिल घरे – गुरे , लाकुडफाटा साठवण, शाळा पाहत , ग्रामस्थांशी संवाद साधुन पुढे शिवगडाकडे जाता येते.
कोकणातील हलचालीवर वचक ठेवता यावा म्हणुन बांधलेला छोटखानी गड म्हणजे शिवगड.
तासभराची चढण पार करुन माथ्यावर पोहोचलो की छोट्या दरीपलिकडे टुमदार शिवगड पाहात त्यच्या सभोवारचा अथांग आसमंत न्याहाळत बसायचे.वाटेत प्रसंगी गेळा किंवा दुरवर गवा पहायला मिळाला तर या गड भ्रमंतीचा आनंद दुणावतो.परतीला माळेवाडी बंधारा पाहुन उगवाइच्या देवराईकडे यावे. स्थानिकानीं गरजेपोटी सरसकट लाकुडतोड करु नये , प्रदेशारीष्ठ वनराजीतरी शाबुत राहावी , हि दुरदृष्टी ठेवुन देवराया जोपासण्यात आल्या. यांचे प्रमाणही मानवाच्या अति लोभापुढे आता नगण्य झाले आहे. येथिल उंच झाडे व गारवा मनाला भावतो . येथे निवांत बसुन प्राणी व पक्षांच्या हलचाली टीपाव्यात.
जर एखादे शेखरु पहायला मिळाले तर उगवाईदेवी पावली असे समजावे. याची हलचाल – खाउ खाणे पाहताना आपल्याला गुदगुल्या होतातच, पण याचे निद्रीस्त गोजीरवाणे रुप पाहीले कि याचा हेवा वाटुन जातो. काय बिनधास्त ताणुन देतो हा प्राणी.दाजीपुरमधे निवास व्यवस्था मर्यादीतअसल्याने हसने मार्गे राधानगरीला येउन येथिल मोजक्याच लाॅज मधे मुक्काम करावा
राधानगरीची छोटीशी बाजारपेठ सायंकाळी लवकर बंद होते. कोकणात जाणारी बरीचशी वाहतुक रात्रभर येथुन हाेत असते.पहाटे पुनश्च हसने मार्गे तासाभरात दाजीपुर गाठायचे व येथिल अभयारण्याची भटकंती करायची.बलदंड पण लाजर्या गव्यासाठी हे अभयारण्य सर्वश्रुत असले तरी येथे फिरताना विविध पक्षी वनस्पती कृमी काही प्राणी नजरेस पडतात.
स्थानिक जीप किंवा सुमो घेउन दुपारपर्यंत येथिल ठराविक ठिकानानां भेट देउन परत फिरावे. दाजीपुरात किंवा राधानगरीमधे भोजन घेऊन सायंकाळपर्यंत कोल्हापुरात दाखल व्हावे